रत्नागिरी: शहरातील स. रा. देसाई डी.एड. कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पटवर्धन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. मानसी जोशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन डी.एड.च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रा. सुनील जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या पहिल्याच कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित नाटेकर याने केले, तर समीक्षा शितप हिने प्रास्ताविक सादर केले. पाहुण्यांची ओळख निर्झरा डोरलेकर हिने करून दिली, तर वैष्णवी दुर्गवळी हिने उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. मानसी जोशी यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. लोकमान्य टिळकांचा सामाजिक, राजकीय, वैचारिक आणि आरोग्यविषयक करारी बाणा तसेच निर्भीडपणा त्यांनी आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडला.
तसेच, अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा अशी आपली इच्छा व्यक्त करून, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. केवळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करून चालणार नाही, तर या महापुरुषांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणे सार्थकी लागेल, असेही त्यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा ‘युट्युब’वर लावून सर्वांना ऐकवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, कॉलेजच्या प्राचार्यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.