२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध गुटख्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 28 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत होते. काल, दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी हे पथक देवरूख-साखरपा-पाली मार्गावर गस्त घालत असताना, याहू ढाब्यासमोर एक संशयित पिकअप वाहन (एम.एच-10-सीआर-8366) दिसून आले.
पथकाने संशयावरून वाहनाची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) आढळला. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष केलेल्या झडतीमध्ये वाहनाच्या मागील भागात गोण्या आणि पुठ्याच्या बॉक्समध्ये हा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी विकास गंगाराम पडळकर (वय 28, रा. इस्लामपूर, जि. सांगली) आणि तेजस विश्वास कांबळे (वय 23, रा. मिरज, जि. सांगली) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी हा प्रतिबंधित मुद्देमाल संगमेश्वर येथे वितरणासाठी नेत असल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 21 लाख 40 हजार 160 रुपये किमतीचा गुटखा आणि 7 लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड पिकअप वाहन असा एकूण 28 लाख 40 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींवर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पो.उ.नि. श्री. ओगले, पो.हवा/251 झोरे, पो.हवा/477 डोमणे, पो.हवा/301 पालकर, पो.हवा/1067 कदम, पो.हवा/1238 खांब, पो.हवा / 1362 सवाईराम, पो.हवा/1410 दरेकर, पो.हवा/306 सावंत आणि चा.पो.कॉ/215 कांबळे यांनी पार पाडली.