गुहागर : शृंगारतळी मासळी बाजारात गुरुवारी बसण्याच्या जागेवरून दोन मासळी विक्रेत्या महिलांमध्ये जोरदार वाद झाला. वाद एवढा पेटला की दोघींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या. हा वाद विकोपाला गेल्याने तो थेट पाटपन्हाळे ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचला.
ग्रामपंचायतीच्या आवारात पक्की मासळी विक्री शेड असतानाही अनेक महिला रस्त्याच्या कडेला व नाक्यांवर मासळी विक्री करत असल्याने तेथील व्यापारी व नागरिकांकडून तक्रारी होत आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने सर्व विक्रेत्यांना शेडमध्ये बसण्याचा सल्ला दिला होता. मात्र गुरुवारी दोन महिलांमध्ये एकाच जागेवर बसण्यावरून वाद निर्माण झाला.
यातील एका महिलेनं स्वतःसाठी जागा अडवून दुसरीला बसण्यास मज्जाव केला. त्यामुळे झालेला वाद तीव्र होत अखेर ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारीपर्यंत गेला. नंतर संबंधित महिलेनं आपली मासळी घेऊन रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी बसल्याने परिस्थिती शांत झाली.
गुहागरमध्ये मासळी विक्रेत्या महिलांमध्ये वाद पेटला, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या
