जयगड: गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर जयगड सागरी पोलीस ठाण्यात एक महत्त्वाची शांतता बैठक पार पडली. आज, दिनांक २३/०८/२०२५ रोजी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत आयोजित केलेल्या या बैठकीला गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, ग्रामस्थ, मौलाना आणि पोलीस पाटील उपस्थित होते. आगामी सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीलाच पोलिसांनी सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केले असल्यामुळे, गणेशोत्सव मंडळांनी आणि इतर आयोजकांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे अनिवार्य आहे, तसेच मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी असेही सूचित करण्यात आले. मंडळाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह देखावे, फलक किंवा बॅनर लावले जाऊ नयेत, जेणेकरून कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव कालावधीत लावण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकाची ऑनलाइन परवानगी ‘आपले सरकार पोर्टल’वर घ्यावी. विद्युत रोषणाई करताना योग्य ती खबरदारी घेण्याबरोबरच कार्यक्रमादरम्यान कोणीही लेझर लाईटचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. मूर्ती आगमन व विसर्जन वेळी रासायनिक रंगांचा वापर करू नये, तसेच मिरवणुकीतील स्वयंसेवकांनी मद्यपान करून मिरवणुकीत सामील होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. इतर धार्मिक स्थळांवरून मिरवणूक जाताना गुलाल उधळणार नाहीत याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीत गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सण जवळपास एकाच वेळी आल्यामुळे मुस्लिम समाजाने ईद ए मिलादची मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या आधी, म्हणजेच दिनांक ०५/०९/२०२५ रोजी घेण्याचे जाहीर केले. हा निर्णय दोन्ही समाजांतील सलोखा आणि सहकार्य दर्शवतो. या महत्त्वपूर्ण बैठकीत गावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपण आपल्या गावात सतर्क राहून शांतता राखण्यास मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या. गणेशमूर्ती विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने विसर्जन तलाव, रस्ते साफसफाई, रस्सी, लाइफ जॅकेट, पोहणारे व्यक्ती आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी असेही सूचित करण्यात आले आहे. या बैठकीमुळे दोन्ही सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरे होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.