राजापूर: आजकाल दुनियेत माणुसकी हरवत चालली आहे. सध्याच्या मोबाईलच्या दुनियेत जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा त्याला मदत करण्याऐवजी मोबाईल काढून व्हिडीओ शूट करण्यात सारेच मग्न झालेले असतात. सध्याच्या या घटनेवर जगाच्या डोळ्यात अंजन घालणार उदाहरण मुक्या प्राण्यांनी घालून दिलं आहे. पाण्यात वाहून जाणाऱ्या एका गायीला लक्ष्मी, गौरी, सरस्वती या तीन म्हशींनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले आहे. या घटनेमुळे प्राण्यांमध्ये असलेल्या माणुसकीचे दर्शन दिसून आले.
राजापूर तालुक्यातील एका गावात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीला पूर आला आहे. या नदीच्या काठावर एक गाय चरत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती अर्जुना नदीच्या प्रवाहात ओढली गेली. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहत जात होती. गाय घाबरीघुबरी झाली होती. फक्त डोक तेवढं वरती दिसत होत. ती बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती मात्र पाण्याचा प्रवाह तिला तोडत होता. नदीच्या किनाऱ्यावर 3 म्हशीनी ही घटना पाहिली. गायीचा जीव धोक्यात आहे असे वाटल्यावर तिन्ही म्हशींनी पाण्यात उडी घेतली. आणि तिच्यापर्यंत पोहोचल्या. तिघींनी तिला संरक्षण दिलं. गाय वाहून जाऊ नये म्हणून तिघींनी कड तयार केलं. एकीने खालच्या बाजूने आधार दिला. दुसरी तिच्या समोर आडवी राहिली आणि तिसरीने पाठीमागे राहून आधार देत ढकलत नदी काठावर आणले. हे सार दुष्य पाहण्यासारख होतच मात्र तितकंच जिवात धडकी भरणार होत आणि सोबत माणुसकीच दर्शन घडवणारही दृश्य होत. ही घटना तेथील एका तरुणाने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ करून जतन केली. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. “हीच खरी माणुसकी” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
ही दृश्यं पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. एका गावकऱ्याने सांगितले, “म्हशींनी आज शिकवलं ,मदत करायला हात नाही लागत, मन लागतं.”
या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की प्रेम, करुणा आणि माणुसकी फक्त माणसांतच असते असं नाही… मुक्या जनावरांच्या वागण्यातही ती अधिक ठळकपणे दिसते. आज जेव्हा माणसं माणसाकडे पाहून दुर्लक्ष करतात, तेव्हा या तीन म्हशींनी दाखवलेलं उदाहरण प्रत्येकाच्या मनाला भिडणारं आहे.