चिपळूण: गेल्या १९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह सोमवारी १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्याच शेतातील पाण्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
वसंत बाळकृष्ण लोटेकर (वय ६५, रा. शंकरवाडी, मारुती मंदिर, चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. १९ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वसंत लोटेकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी आपल्या शेताकडे गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली, परंतु त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
सोमवार १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काही स्थानिकांना त्यांच्या शेतातील ‘बाऊल’ नावाच्या ठिकाणी असलेल्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा केला.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ५२/२०२५, वारस बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वसंत लोटेकर यांचा मृतदेह अशाप्रकारे अचानक सापडल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.