रत्नागिरी: शहरानजीकच्या खेडशी येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात पोलिसांच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या ‘ब्रेड ॲण्ड ब्रेकफास्ट’ या लॉजवर केवळ सात दिवसांत तब्बल ८६ गिऱ्हाईक येऊन गेल्याचे उघड झाले आहे. प्रत्येक गिऱ्हाईकाकडून आरोपी २ हजार रुपये आकारत होते, त्यापैकी अर्धी रक्कम वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना देण्याचे ठरले होते, अशी माहिती आता पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
शहरानजीकच्या खेडशी येथे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याने संयुक्त कारवाई करत देहव्यापाराचा हा प्रकार उघडकीस आणला होता. १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतले होते.
अनधिकृत व्यापार करणाऱ्या अरमान करीम खान (रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांच्यासह तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी सलमान मुकादम अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.
१३ मे रोजी केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या चार महिलांपैकी दोन महिला गुजरातच्या, एक मुंबईची आणि एक कर्नाटकची रहिवासी होती. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी पोट भरण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचे जबाब दिले आहेत. वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी तीन व्यापाऱ्यांविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कायद्यांतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.