रत्नागिरी: रत्नागिरीत गाजलेल्या भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटील याला त्याच्या पित्याच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी न्यायालयानं बुधवारी मुभा दिली आहे. खुनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या दुर्वास पाटीलला या दुर्दैवी प्रसंगी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देता यावा, यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्वास पाटीलचे वडील दर्शन पाटील हेदेखील एका ‘वीर खून’ प्रकरणातील संशयित आरोपी होते. दर्शन पाटील हे न्यायालयीन कोठडीत होते, मात्र दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवानं, तिथे उपचारांदरम्यान त्यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
पोलिस कस्टडीतच अंत्यसंस्काराला उपस्थिती:
वडिलांच्या निधनानंतर, अंत्यसंस्काराचे विधी पार पाडण्यासाठी दुर्वास पाटील याला उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आला होता. या मागणीवर सुनावणी होऊन न्यायालयाने त्याला बुधवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीसाठी पोलिस कस्टडीतच अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्याची मुभा दिली. या वेळेत तो कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हजर राहणार आहे.
१५ दिवसांच्या जामिनाची मागणी:
दरम्यान, दुर्वास पाटील याच्या वकिलांनी वडिलांच्या अंत्यसंस्कारासह पुढील विधी पार पाडण्यासाठी न्यायालयात १५ दिवसांच्या जामिनाची मागणी केली आहे. या महत्त्वपूर्ण मागणीवर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयात सुनावणी सुरू होती, आणि आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती गंभीर गुन्ह्यात संशयित असल्याने आणि त्यातही एका संशयिताचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.