GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या वन्यजीव माहिती कलादालनास नीलेश बापट यांचे नाव देण्याची मागणी

Gramin Varta
86 Views

चिपळूण:  येथील रत्नागिरी विभागीय वन कार्यालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या वन्यजीव माहिती कला दालनास दिवंगत निसर्गप्रेमी कै. नीलेश बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विविध संस्था व निसर्गप्रेमींकडून करण्यात आली आहे.

गेल्या सप्टेंबरमध्ये नीलेश बापट यांचे आकस्मिक निधन झाले. ते निसर्ग-पर्यावरण, पक्षी व वन्यजीव क्षेत्रात आपल्या बहुआयामी कार्यामुळे ख्यातकीर्त झाले होते. त्यांनी व्याख्याने, शिबिरे, सहली, ट्रेक, कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व युवकांना निसर्गाबद्दल आकर्षित केले. निसर्ग कार्यकर्त्यांची नवीन पिढी घडविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

वन विभागाने त्यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली होती. जंगलातील मूळनिवासी आदिवासी समाजाचा विकास साधण्याचे, तसेच विविध सामाजिक प्रसंगांत लोकांना मदत करण्याचे कार्य त्यांनी परिश्रमपूर्वक केले. वन्यजीवांच्या जीवनशैलीवर त्यांनी केलेला संशोधनपर अभ्यासही उल्लेखनीय होता.

विशेष म्हणजे चिपळूणला उभारण्यात येणाऱ्या कलादालनाची संकल्पना, नकाशा, अंतर्भूत उपक्रम याबाबतचा परिपूर्ण प्रकल्प अहवाल स्वतः कै. बापट यांनीच वन विभागाला दिला होता. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, पालकमंत्री उदय सामंत व आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांमुळे हे दालन आता साकारत आहे.

या पार्श्वभूमीवर कलादालनास “कै. नीलेश बापट कला दालन” असे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. या संदर्भात विविध निसर्गप्रेमी संस्था व नागरिकांकडून निवेदने संकलित करून पालकमंत्री उदय सामंत यांना सादर करण्यात आली आहेत. ग्लोबल चिपळूण व अर्थ फाउंडेशनच्या वतीने रामशेठ रेडीज, शाहनवाज शाह, अजित जोशी, समीर कोवळे यांनी निवेदन दिले. तसेच आमदार शेखर निकम यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली असून लवकरच वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेण्यात येणार आहे.

Total Visitor Counter

2648143
Share This Article