संतोष सावर्डेकर/ चिपळूण:सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा आज वाढदिवस. सहकाराच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय त्यांनी सातत्याने जोपासले. दूरदृष्टीचे नेतृत्व, नियोजनबद्ध कार्यपद्धती, सामाजिक बांधिलकी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी या गुणांच्या जोरावर चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रगतीचा पाया भक्कम केला. संस्थेच्या विकासाबरोबरच सभासदांचा विश्वास संपादन करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभावी परंपरा जपली आहे. या वाटचालीत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ, पत्नी सौ. स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांची समर्थ साथ लाभली आहे. ‘सहकारातून समृद्धीचा ध्यास घेणारे’ सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला थोडक्यात आढावा…!
चिपळूण तालुक्यात उभळे या छोट्याशा गावात सुभाषराव चव्हाण यांचा जन्म झाला. शिक्षणानंतर मुंबईत नोकरीसाठी गेले. काही काळ त्यांनी तिथे नोकरी केली. मात्र. तिथे त्यांचे मन रमले नाही. गावाकडे सतत त्यांचा ओढा राहिला. यातून त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून पुन्हा चिपळूणकडे परतण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच त्यांच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. चिपळूणला आल्यानंतर सुभाषराव चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी स्वीकारली. या नोकरीतच सहकारातील बारकावे जाणून घेतले. सहकारातून शेतकरी, तरुण, महिलावर्ग यांची आर्थिक उन्नती होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे रोपटे लावले!
सेवानिवृत्तीनंतर शांतपणे जीवन जगण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी आपल्या आयुष्याचा काहीतरी लाभ व्हावा, या उद्देशाने त्यांनी सेवानिवृत्तीपूर्वीच मनाशी ठाम निश्चय केला आणि त्यातून सेवेत असतानाच सुभाषराव चव्हाण साहेबांनी १९ ऑक्टोबर १९९३ रोजी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची निर्मिती झाली. सहकाराच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा त्यांचा प्रवास इथूनच सुरू झाला. दरम्यान, सन २००५ रोजी चव्हाण साहेब जिल्हा बँकेच्या सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी लावलेल्या रोपट्याला अधिक पूर्णवेळ बळ मिळाले. एखादी संस्था सुरू करणे सोपे असते. परंतु तिच्यावर सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वास निर्माण करणे, तो विश्वास वर्षानुवर्षे टिकवणे आणि संस्थेला समाजाच्या विकासाशी जोडणे ही खरी कसोटी असते. संस्थापक अध्यक्ष म्हणून सुभाषराव चव्हाण यांनी ही कसोटी आपल्या कार्यातून पार पाडली. विश्वास, पारदर्शकता, शिस्त आणि सभासदांचे हित या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी संस्थेच्या वाटचालीला भक्कम दिशा दिली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा विशेष म्हणजे त्यांची सर्वसामान्यांची असलेली नाळ, सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता आणि त्या अडचणींवर शक्य त्या मार्गाने तोडगा काढण्याची धडपड त्यांच्या कार्यात सातत्याने दिसून आली. त्यामुळे पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था न राहता अनेकांच्या विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र बनावे, अशी त्यांची भूमिका राहिली.
सहकार क्षेत्रामध्ये ‘एकमेकांच्या सहकार्याने सर्वांची प्रगती’, हा मूलमंत्र आहे. या विचाराला आपल्या कार्यातून प्रत्यक्ष रूप देताना सुभाषराव चव्हाण यांनी अनेक सहकार्यांना सोबत घेतले. नेतृत्व म्हणजे केवळ पुढे राहणे नव्हे तर आपल्या सोबतच्या प्रत्येकाला पुढे घेऊन जाणे याची प्रचिती त्यांच्या कार्यातून येते. त्यांचा साधेपणा, आपुलकीचा स्वभाव आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळे त्यांना सहकार क्षेत्रात आपलेपणाचे स्थान प्राप्त झाले आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची आतापर्यंतची वाटचाल सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक ठरली आहे.
सुभाषराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून वाशिष्ठी डेअरीची मुहूर्तमेढ!
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आपल्या भाषणातून नेहमीच शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना दिली. तर येथील शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो, बोलून दाखवत असत. शेती व्यवसायातून कोकणात दुग्ध क्रांती होईल, असा सुभाषराव चव्हाण यांना विश्वास असे, यातूनच त्यांच्या संकल्पनेला आकार देण्यासाठी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव तसेच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी पुढाकार घेतला. कोकणात दुग्ध व्यवसाय होत नाही, या नकारात्मकतेला छेद देण्याचा यादव दाम्पत्याने ठाम निर्धार केला आणि वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे भूमिपूजन दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी पिंपळी खुर्द, ता. चिपळूण येथे झाले. त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण करून ५ फेब्रुवारी २०२३ रोजी तो शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित झाला. यानंतर स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ, योग्य मोबदला आणि दुग्धव्यवसायाला स्थैर्य मिळवून देणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू राहिला आहे. स्थापनेपासूनच आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण दूध संकलन, प्रक्रिया आणि ग्राहकांचा विश्वास या प्रकल्पाने भर दिला आहे. वाशिष्ठी डेअरीच्या वाटचालीकडे पाहिले असता, शेतकरी, ग्राहक आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून तिची भूमिका अधोरेखित होते. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेसोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि पशुपालकांना प्रोत्साहन देण्याचे कामही संस्थेने केले आहे. बदलत्या बाजारपेठेच्या गरजा ओळखून उत्पादनविविधीकरण आणि आधुनिक व्यवस्थापन स्वीकारत वाशिष्ठी डेअरीने कोकणातील दुग्धक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला वाशिष्ठी डेअरी हा दुग्ध प्रकल्प शेतकरी सुशिक्षित तरुण व महिला वर्गांसाठी रोजगाराचा राजमार्ग ठरला आहे. यातून सुभाषराव चव्हाण यांची दूरदृष्टी स्पष्ट होत आहे.
वयाच्या ८०व्या वर्षीदेखील सहकारात कार्यरत!
चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आजही ८० व्या वर्षीही नव्या जोमाने, नव्या उमेदीने तरुणांना लाजवेल, असा पतसंस्थेचा कारभार अधिक सक्षमपणे पाहत आहेत. आतापर्यंतच्या सहकार क्षेत्रातील वाटचाल पाहता त्यांचे साधे राहणीमान राहिले आहे. कोणताही बडेजाव नाही, यातूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची समजते. सुभाषराव चव्हाण यांना आतापर्यंतच्या सहकार क्षेत्रातील वाटचालीबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सहकार क्षेत्रातील योगदानामुळे मा. सुभाषराव चव्हाण साहेबांना मिळालेले पुरस्कार-
१५.११.२००९ : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे शिक्षणतज्ज्ञ मा. डॉ. गजानन पाटील यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार
३०.११.२००९ : महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन पुणे यांच्यातर्फे नवी मुंबई येथे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ शरद उपाध्ये यांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्कार
०५.०२ २०१० : श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान मुंबईतर्फे परळ येथे सामाजिक कार्यकर्ते मा. भालचंद्र पाटील यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार
२७.०५.२०१० : महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन पुणे यांच्यातर्फे गोवा येथे गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा. दिगंबर कामत यांच्या हस्ते दी प्राईड ऑफ इंडिया: भास्कर अॅवॉर्ड २०१० पुरस्कार
२९.०८.२०१० : साहित्यप्रेमी सार्वजनिक वाचनालय इस्लामपूर आयोजित राज्यस्तरीय साहित्यप्रेमीतर्फे कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्मता गिरीश ओक यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार.
२०.०२.२०११ : कोहिनूर फाऊंडेशन मुंबईतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार.
२५.०१.२०१९ : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी पुणे आयोजित अॅड्. रावसाहेब शिंदे विशेष सन्मान सहकार पुरस्कार भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानित करण्यात आले.
१५.१०.२०२३ : लोकशाही मराठी वृत्तवाहिनीतर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरद पवार साहेबांच्या हस्ते लोकशाही सहकार सन्मान २०२३ पुरस्कार.
२३.०९.२०२४ : चिपळूणमधील जीएसके न्यूज, मराठी समाचार आणि राजसत्ता न्यूज यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते कोकण भूषण पुरस्कार
१३.०४.२०२५ : कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे सहकार भूषण पुरस्कार तर नवभारत-नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती
संस्थेचे कार्यक्षेत्र- महाराष्ट्र राज्य
मुख्य कार्यालयासह एकूण शाखा- ५०
सभासद (‘अ’ वर्ग सभासद)- १,४६,६८२
भागभांडवल- ८३,६६,९२,९००.०० रूपये
रिझर्व्ह फंड व इतर फंडस- १०३,१०,८६,६४२.२७ रूपये
एकूण स्वनिधी- १८६,७७,७९,५४२.२७ रूपये
ठेवी- १२४८,२६, ०४,२९१.६४ रूपये
एकूण कर्ज- १०७१,४०,८०,७०९.३४ रूपये
त्यापैकी सोनेतारण व ठेवतारण कर्जे- ४१२,२७,०४,०३०.०० रूपये
बाहेरील बँक कर्जे- १५,५३,३४,८३३.६१
गुंतवणूक- ३४९,०२,७१,३७५.०० रूपये
निव्वळ नफा- २२,०२,५९,१९०.७३ रूपये
एकूण कर्मचारी- २६३
अल्पबचत प्रतिनिधी- ५३
सोने तपासणीस सराफ- ३५
खेळते भांडवल- १४७६,९१,७३,३७३.१५
लाभांश- १५%
ऑडीट वर्ग- ‘अ’





