GRAMIN SEARCH BANNER

आमदार किरण सामंत यांनी दिलेला शब्द पाळला; नुकसानग्रस्तांना दिलासा

Gramin Varta
167 Views

लांजा : परतीच्या मुसळधार पावसामुळे लांजा शहरातील श्रीराम पुलाजवळील भागात पाणी शिरून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या घटनेनंतर आमदार किरण सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी ठेकेदार कंपनीकडून तातडीने नुकसानभरपाई मिळाली नाही, तर स्वतः प्रयत्न करून ती मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

तो शब्द पाळत आमदार सामंत यांनी बाधितांच्या मदतीसाठी स्थानिक यंत्रणा तातडीने सक्रिय केल्या. मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी आमदार सामंत यांच्या माध्यमातून बाबा लांजेकर यांनी बाधित परिसरात घरपोच पाण्याचे टँकर पाठवले. तसेच पावसामुळे दूषित झालेल्या विहिरी स्वच्छ करण्यात आल्या आणि नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व कामांवर आमदारांनी स्वतः लक्ष ठेवले होते.

दरम्यान, ठेकेदार कंपनीलाही आमदार सामंत यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने भरपाई देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी मंगळवारी दुपारी घटनास्थळी येऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे सांगितले.

या कारवाईमुळे बाधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, “आमदार सामंत यांनी दिलेला शब्द पाळला आणि आमच्या अडचणींना तत्काळ प्रतिसाद दिला” असे सांगत नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी बाबा लांजेकर, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी नरेश सितलानी, नौशाद नेवरेकर, सलमान देवानी, मुकरम देवानी, साहिल इसानी आदी उपस्थित होते.

लांजातील पावसामुळे झालेल्या नुकसानीतून नागरिकांना दिलासा देत आमदार किरण सामंत यांनी पुन्हा एकदा आपला जनसंपर्क आणि संवेदनशील नेतृत्व सिद्ध केले आहे.

Total Visitor Counter

3200936
Share This Article