संगमेश्वर/एजाज पटेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाने आता क्रूरतेची सीमा ओलांडली असून संगमेश्वर सोनवी चौकातील भीषण वाहतूक कोंडीत शुक्रवारी चक्क ‘१०८’ रुग्णवाहिका अडकून पडल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कुरधुंडा येथील एका गंभीर रुग्णाला आणण्यासाठी निघालेली ही रुग्णवाहिका बराच वेळ या कोंडीत अडकून पडल्याने, महामार्ग ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा बळी आता रुग्णांनी द्यायचा का, असा जळजळीत सवाल जनतेतून विचारला जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सोनवी चौकातील रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला असून ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडून कामाचा राडारोडा तसाच टाकून दिला आहे. अरुंद रस्ता आणि प्रचंड खड्ड्यांमुळे दररोज या ठिकाणी किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असतानाही महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदार निर्लज्जपणे गप्प बसून असल्याचे चित्र दिसत आहे. आज या कोंडीत रुग्णवाहिकेचा सायरन वाजत होता, रुग्ण जिवाच्या आकांताने मदतीची वाट पाहत होता, पण ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे रुग्णवाहिकेला रस्ता मिळणे दुरापास्त झाले होते. हा केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासकीय उदासीनतेने केलेला हा रीतसर ‘खून’ करण्याचा प्रयत्न आहे, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
एकीकडे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि त्यांचे पथक तसेच महामार्ग पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर उतरून ही कोंडी फोडण्यासाठी जीवाचे रान करत असताना दुसरीकडे कंत्राटदार कंपनीला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना दाद न देणारा हा ठेकेदार कोणाच्या आशीर्वादाने जनतेच्या जिवाशी खेळत आहे, अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी होऊनही जर साधी रुग्णवाहिका वेळेत बाहेर पडू शकत नसेल, तर या विकासकामाचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोनवी चौकातील या परिस्थितीमुळे जनतेचा संयम आता सुटत चालला असून आज रुग्णवाहिका अडकली असली तरी उद्या जर एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने जर तात्काळ या मुजोर ठेकेदारावर कठोर कारवाई करून रस्ता मोकळा केला नाही, तर आगामी काळात जनतेच्या उग्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.





