रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर पिकअपशेडसमोर १५ जून रोजी दुपारी २.३० वाजता रिक्षा आणि ॲक्टिवा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह सहा जण जखमी झाल्याची घटना घडली होती. रिक्षाचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी २५ जून रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित अरविंद वाडकर (५२, आदर्श वसाहत, कारवांचीवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशियताचे नाव आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याबाबत महिला पोलिस कॉन्स्टेबल ईशिता रुपेश वाडावे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजित अरविंद वाडकर हा त्याच्या (एम.एच. ०८ के ४४१९) रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करत होते. त्यांनी मागील सीटवर तीन प्रवासी आणि पुढील सीटवर आपल्या बाजूला एक प्रवासी बसवला होता.
१५ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास, वाडकर हे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, रिक्षा हयगयीने आणि बेदरकारपणे चालवत होते. रस्ता ओलांडत असलेल्या (एम.एच. ०८/ए.एफ./६००६ ) ॲक्टिवा दुचाकीला त्यांनी पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने रिक्षा ॲक्टिवावर पलटी झाली, ज्यामुळे मोठा अपघात घडला.
या अपघातात ॲक्टिवावरील चालक सलहान सुलेमान दर्वे (रा. मिरकरवाडा) आणि त्यांच्या मागे बसलेला अजमल खालिद माजगावकर (रा. मिरकरवाडा) हे जखमी झाले. तसेच, रिक्षातील प्रवासी विनोद शंकर धनवडे (रा. वाटड, खंडाळा), तेजस विनोद धनवडे (रा. वाटड, खंडाळा), कार्तिक किरण घेवडे (रा. वाटड, खंडाळा) आणि रिक्षाचालक अजित अरविंद वाडकर स्वतः किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत. वाहतुकीचे नियम पाळावेत आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रत्नागिरी आरोग्य मंदिर येथे रिक्षा-ॲक्टिवा अपघातात 6 जखमी, रिक्षा चालकावर गुन्हा

Leave a Comment