वाशीम : पोलिस कोठडीत बेग्या पवार याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वाशीम जिल्हा सत्र न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल देत रिसोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार माधव माणिकराव धांडे यांच्यासह ९ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खळबळजनक प्रकरणात न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. राज्याच्या पोलिस दलाच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांना जन्मठेप होण्याची ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
ही घटना ९ मे २०११ रोजी घडली होती. रिसोड पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासासाठी बेग्या पवार आणि राजू पवार यांना पहाटेच्या वेळी ताब्यात घेतले होते. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर बेग्या पवार याला अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या शरीरावर ४३ गंभीर जखमा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी उपचारासाठी वाशीम येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आले होते. सीआयडीच्या पथकाने सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण ४७ साक्षीदार तपासले असून, वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे हा गुन्हा सिद्ध झाला.
जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी दोषी ठरविलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश सीताराम ताराम, नागोराव भगवान खंडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कनीराम जाधव यांचा समावेश आहे. सरकार पक्षातर्फे वकील श्रीराम नारायणराव काळू यांनी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही कायदा हातात घेऊन कोठडीत अमानुष छळ करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचा मुद्दा न्यायालयात भक्कमपणे मांडला. न्यायालयाने सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या खून, अमानुष छळ करणे, गंभीर दुखापत करणे आणि गुन्हेगारी कारस्थान रचणे यांसारख्या गंभीर कलमांखाली दोषी ठरविले आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाच या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्याने संपूर्ण कायदेशीर आणि सामाजिक वर्तुळात या निकालाची मोठी चर्चा सुरू आहे.
