रत्नागिरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोळप येथे शेतात काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने एका प्रौढ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. नरेंद्र शंकर आंबेकर (वय ५५, रा. गोळप, तोरस्करवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र आंबेकर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. त्याचवेळी त्यांना एका विषारी सापाने दंश केला. सर्पदंशानंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गोळप गावावर शोककळा पसरली आहे.