दिनेश पेटकर / गावखडी
रत्नागिरीत श्रावण मास काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यामुळे चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याचे काम जोमात सुरू झाले आहे. वरचा फगरवठार येथील मूर्तीकार वामन सुवरे यांच्या चित्रशाळेत आजपर्यंत शंभरहून अधिक गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
या वर्षी कृष्ण अवतारातील कृष्ण-बलरामाचे बंधू प्रेम, यशोदा कृष्णाला दहीहंडी फोडताना दाखवणाऱ्या मूर्ती, तसेच सिंहासनावर विराजमान झालेला लालबागचा राजा अशा विविध प्रकारच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. मात्र, सिंगल गणेशमूर्तीला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.
वामन सुवरे हे मागील तीस वर्षांपासून मूर्तीनिर्माण करत आहेत. पावस, रत्नागिरी आणि पंचक्रोशीतील गणेशभक्त त्यांच्या चित्रशाळेला भेट देऊन मूर्ती बनवण्यासाठी आग्रह धरत आहेत. या कलेतून प्रेम, आपुलकी आणि भक्तिभाव वृद्धिंगत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गणपती मूर्ती तयार करताना लागणारी माती, रंग, ब्रश, पितांबर, हिरे, फेटे यांची किंमत वाढलेली असली तरी गणेशमूर्ती सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत.
गणेशोत्सव अगदी जवळ आला असताना अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे मूर्ती तयार करताना अडचणी येतात. तरीही मूर्तीकामात ते पूर्ण मनोभावे आणि भक्तीने मग्न झाले आहेत.