चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधून तब्बल १ लाख ५० हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून मांडवी एक्सप्रेसमध्ये चढत असताना ही चोरी झाली. याप्रकरणी अक्षता समीत मोरे (२९, रा. साईनाथनगर, विरार, जि. पालघर) यांनी तक्रार दाखल केली असून, चिपळूण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षता मोरे या मुंबईला जाण्यासाठी मांडवी एक्सप्रेसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्यावर लावलेल्या पर्सची चेन उघडून सोन्याचे दागिने लंपास केले. चोरलेल्या दागिन्यांमध्ये सव्वा दोन तोळे वजनाचे तीन पदरी मंगळसूत्र (किंमत ₹१,०१,२५०), अडीच ग्रॅम वजनाची अंगठी (₹११,२५०), दोन ग्रॅमचे बटन टाईप कानातले (₹९,०००), अडीच ग्रॅमचे सोन्याचे टॉप (₹११,२५०), साडेतीन ग्रॅमच्या सोन्याच्या पट्ट्या (₹१५,७५०) आणि अर्धा ग्रॅमची सोन्याची नथ (₹२,२५०) यांचा समावेश आहे.
या घटनेनंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिपळूण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चिपळूण रेल्वे स्थानकावर महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे दागिने चोरीला
