लांजा : लांजा पंचायत समिती शिक्षण विभागातील अत्यंत कार्यतत्पर, परोपकारी आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या शिल्पा सुहास देसाई (वय अंदाजे ५५) यांचे शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चिपळूण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने देसाई कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून लांजा परिसरात शोककळा पसरली आहे.
शिल्पा देसाई या लांजातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुहास देसाई यांच्या पत्नी होत्या. पंचायत समितीतील कामकाजादरम्यान त्यांनी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून मदतीचा हात दिला होता. त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्या ‘अजातशत्रू’ म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या जाण्याने लांजा शहरात आणि पंचायत समितीमध्ये एक शून्यता निर्माण झाली आहे.
शिल्पा देसाई यांच्या पश्चात पती डॉ. सुहास देसाई, दोन मुलगे, सासू-सासरे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार रविवारी (३ ऑगस्ट) सकाळी १० वाजता लांजा खावडी येथील स्मशानभूमीत होणार आहेत.
शिल्पा देसाई यांच्या निधनानंतर परिसरातील नागरिक, सहकारी, पदाधिकारी, मान्यवर यांच्यातून शोक व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत मृतात्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना व्यक्त केली आहे.