GRAMIN SEARCH BANNER

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची हकालपट्टी करा; अनिल परब यांची मागणी

Gramin Varta
141 Views

मुंबई: पुण्याचा फरार गुंड नीलेश घायवळ याचा दाखलेबाज भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना दिल्याबद्दल गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना नेते , आमदार अ‍ॅड . अनिल परब यांनी आज केली . घायवळ याला कोणत्या पद्धतीने शस्त्र परवाना दिला गेला त्याचे पुरावेच अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले .

अनिल परब यांनी वांद्रे येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला की पोलीस त्याची छाननी करतात. परवाना मागणाऱया व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली जाते. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत का, त्याच्या जिवाला खरोखरच धोका आहे का, त्याचे समाजातील स्थान काय आहे याची सखोल चाचपणी केली जाते. त्यानंतर शस्त्र परवाना देण्याबाबत पोलीस निर्णय घेतात. खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या सचिन घायवळला पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता. तरीही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घायवळ हा बांधकाम व्यावसायिक असल्याने त्याला रोज मोठय़ा रकमेची देवाणघेवाण करावी लागते असे सांगत त्याला शस्त्र परवाना मंजूर केला. त्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांचा अहवालही कदम यांनी बाजूला सारला, असा आरोप अनिल परब यांनी केला.

मंत्री योगेश कदम आईच्या नावाने डान्सबार चालवतायत, मुली नाचवून भाडे खातात, गँगस्टर लोकांना पोसत आहेत, गुंडांना शस्त्र परवाना देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर असे मंत्री चिखलफेक करत असतानाही मुख्यमंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसले आहेत? असा सवाल अनिल परब यांनी केला. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याच्या मागे काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार असेल किंवा योगेश कदम घायवळांना त्यांच्यासाठी काम करा असे म्हणत असतील, असाही आरोप अनिल परब यांनी केला. योगेश कदम यांनी असे आणखी कुणाकुणाला शस्त्र परवाने दिले त्याचीही माहिती आपण काढत आहोत, असे ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार

याप्रकरणी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन योगेश कदम यांची गृह राज्यमंत्री पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. येत्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना या मुद्दय़ावरून आवाज उठवेल आणि रस्त्यावरही उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. गृह, महसूलसारखी खाती या दिवटय़ाला दिली आहेत, तिथे बसून ते काय काय प्रताप करत आहेत हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी
केली.

लोकायुक्तांकडेही जाणार

सचिन घायवळ याच्यावर गुन्हे प्रलंबित नव्हते म्हणून त्याला परवाना दिला, असा दावा योगेश कदम यांनी केला आहे. त्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, हे लंगडं समर्थन आहे. घायवळ हा गुंडाचा भाऊ असल्याचा पोलिसांचा रिपोर्ट आहे. त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. गुन्हे त्याच्यावर दाखल होते. याप्रकरणी शिवसेना लोकायुक्तांकडेही जाणार आहे. पण त्याआधी मुख्यमंत्र्यांना योगेश कदम यांच्यावर कारवाईची संधी देणार असल्याचे अनिल परब म्हणाले.

…मग रामदास कदमांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणाचीही नव्याने चौकशी करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी रामदास कदम यांनी केली तशीच रामदास कदम यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणाचीही नव्याने चौकशी करावी अशी आपली मागणी आहे, असे अनिल परब यावेळी म्हणाले.

मर्सिडीज गाड्या माझ्या कष्टाच्या पैशाच्या

अनिल परब यांना एका बिल्डरने दोन मर्सिडीज गाड्या दिल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यावर आपण व्यावसायिक असून त्या गाड्या आपल्या कष्टाच्या पैशातून घेतल्या असल्याचे स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिले. त्यांचा उल्लेख निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात असल्याचेही त्यांनी सांगितले. संपत्तीबद्दल आपल्याला विचारणा करण्याचा अधिकार ईडी आणि इन्कम टॅक्सला आहे, रामदास कदमना नाही, असेही ते म्हणाले. हिंमत असेल तर चौकशी करा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Total Visitor Counter

2648145
Share This Article