राजापूर : तालुक्यातील वाटुळ येथील सुपर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रशासकीय मंजुरी आणि निधी वितरणाअभावी रखडले आहे. याबाबत प्रश्न उपस्थित करत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाचे लक्ष लेधले आहे. राजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुपर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल महत्त्वाचे आहे. त्यामुळे या हॉस्पिटलच्या उभारणीला प्रशासकीय मान्यता देताना निधीचेही तत्काळ वितरण व्हावे, अशी मागणी आमदार खोत यांनी केली आहे.
तालुक्यामध्ये सर्वसोयींनीयुक्त हॉस्पिटल नसल्याने येथील सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रत्नागिरी, मुंबई वा कोल्हापूर येथील हॉस्पिटलवर अवलंबून राहावे लागत आहे; मात्र, त्या ठिकाणी येणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षी सातत्याने अपघात होतात. या अपघातामधील जखमींवर उपचार करण्याच्यादृष्टीने हॉस्पिटल नसल्याने त्यांचीही हेळसांड होते. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये सुपर मल्टिस्पेशालिस्ट व्हावे, अशी गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरवासीयांची मागणी आहे. ही मागणी पंचक्रोशी
ग्रामविकास समिती राजापूर मुंबईने गेली सात-आठ वर्षे सातत्याने शासनदरबारी मांडली असून, त्यासाठी पाठपुरावाही केला आहे. पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या मागणीला लोकप्रतिनिधींची साथ मिळालेली आहे. राजापुरातील वाटुळ येथे सुपर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलला मंजुरी मिळाली आहे; मात्र, त्याला प्रशासकीय मंजुरी आणि निधीवितरणाअभावी या हॉस्पिटलची उभारणी रखडलेली आहे. याकडे खोत यांनी अधिवेशनामध्ये लक्ष वेधले.
सुपर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या मंजुरीमुळे वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता; मात्र, प्रशासकीय मंजुरी आणि निधी वितरण न झाल्याने हॉस्पिटलच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे हॉस्पिटलला तत्काळ प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरित करावा, अशी मागणी आमदार खोत यांनी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केली.
राजापूरमधील ‘वाटुळ येथील सुपर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी तातडीने निधी द्या : सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनात मांडला मुद्दा
