रत्नागिरी: कोकण रेल्वेच्या दादर-सावंतवाडी मार्गावर एका तिकीट तपासनीस (टीसी) कर्मचाऱ्याने दाखवलेल्या असामान्य सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आणि एका अपहरण झालेल्या 2 वर्षांच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयातून पळवून आणलेले हे बाळ होते. संदेश चव्हाण नावाच्या या टीसीने दाखवलेले धाडस आणि जागरूकता सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे.
27 सप्टेंबर रोजी दादर ते सावंतवाडी धावणाऱ्या रेल्वेमध्ये टीसी संदेश चव्हाण यांना एका लहान मुलासोबत आढळलेल्या एका तरुण व्यक्तीचे वागणे संशयास्पद वाटले. हे बाळ त्याचे नसून त्याने ते पळवून आणले असावे, असा संशय चव्हाण यांना आला. त्यांनी त्वरित त्या व्यक्तीची चौकशी सुरू केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, ज्यामुळे चव्हाण यांचा संशय अधिकच बळावला.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता टीसी संदेश चव्हाण यांनी त्या संशयित इसमाला धरून ठेवले आणि त्याचवेळी चालत्या ट्रेनमधून तातडीने नियंत्रण कक्ष तसेच वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांना माहिती दिली. संदेश चव्हाण यांच्या या माहितीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ताजने आणि ड्युटीवरील पोलिसांनी त्वरित हालचाल केली आणि संशयित आरोपी व त्याच्याकडील मुलाला ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल अनंत उदलकर (वय 42, रा. इंदील, देवगड) असून, त्याने 2 वर्षांच्या आयुष अजयकुमार हरिजन या बाळाला मुंबईतील केईएम रुग्णालयातून पळवून आणल्याचे चौकशीत उघड झाले. आयुषची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपीने आजीच्या ताब्यातून बाळाचे अपहरण केले होते. यानंतर आरोपीला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
टीसी संदेश चव्हाण यांच्या या धाडसी कामगिरीची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने त्वरित घेतली आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी संदेश चव्हाण यांचे विशेष कौतुक करत त्यांना पंधरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच, विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. केवळ आपले कर्तव्य बजावत असताना दाखवलेल्या या मानवतेमुळे आणि सतर्कतेमुळे एका लहान बाळाला जीवदान देणाऱ्या या टीसीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.