GRAMIN SEARCH BANNER

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

Gramin Search
9 Views

मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २५ वर्षापेक्षा जुने सर्व पूल, साकव तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा.

तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, वारी महामार्ग सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिल्या.

राज्यातील सर्व पूल व साकवांचा आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री भोसले बोलत होते. बैठकीस सचिव (बांधकाम) संजय दशपुते उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अदाज हवामान विभागाने दिला असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, पुल व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर एखादा पूल धोकादायक असेल तर त्या ठिकाणी वाहतूक बंद करुन पर्यायी मार्ग तातडीन उपलब्ध करून द्यावा. तसेच त्या ठिकाणी नवीन पूल, साकव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. धोकादायक पुलाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हवलता न येणारे बॅरिकेट्स लावावेत. स्थानिक पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांना धोकादायक पुलाविषयी माहिती कळवावी. पर्यायी रस्ता सुस्थितीत असेल याची काळजी घ्यावी. धोकादायक पुलावर ठळक अक्षरातील फलक लावण्यात यावेत. महामार्गावरील वापरात नसलेल्या पूलांच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून ते बंद करावेत. सार्वजनिक इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. यापूर्वी पावसाळापूर्व विभागामार्फत करावयाची कामे या बाबात मे महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती या मध्येही सर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भोसले म्हणाले की, सर्व रस्ते खड्डे मुक्त राहतील याची काळजी घ्यावी. तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः गणपती उत्सव काळात या मार्गावरून चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम पूर्ण करावे. विना अडथळा वाहतूक सुरू राहील, याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. परशुराम घाटात पर्यायी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. नियमाप्रमाणे सर्व वळण रस्ते तयार करावेत. वळण रस्ते पूर्ण झाल्यानंतरच मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करावी. घाट रस्त्यांवर जाळी बसवणे, ते सुस्थितीत ठेवणे तसेच दरड कोसळल्यास किंवा इतर अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

वारी महामार्गावर वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा उभाराव्यात. या मार्गावरील पुल, साकव यांचे कठडे दुरुस्त करावेत. तसेच या मार्गावरील पुलांचीही तपासणी करण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने वारी मार्गाची सर्व कामे करण्यात यावीत. वारीसाठी मार्ग पूर्ण सुरक्षित राहील याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. रस्त्यावरील खड्ड्यांविषयी विभागाने सुरू केलेल्या ॲपचा प्रभावी वापर करावा अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

Total Visitor Counter

2652120
Share This Article