GRAMIN SEARCH BANNER

डिजेच्या वाढत्या मागणीने पारंपारिक ढोल–ताशा, संबळ वादकांची उपासमार; कलावंतांचे अस्तित्व धोक्यात

Gramin Varta
203 Views

सचिन यादव / धामणी : काळ बदलला आणि प्रत्येक क्षेत्रात नवनवीन स्पर्धा निर्माण झाली. त्याच्या झळा आता पारंपारिक वाद्यकलेलाही बसू लागल्या आहेत. कधीकाळी लग्न, साखरपुडा, हळद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा प्रत्येक सोहळ्यात ढोल–ताशा, झांज, संबळ, बॅंजो, बँड पथकांची धूम असायची. मात्र डिजे संस्कृती झपाट्याने वाढत गेली आणि या पारंपारिक वाद्यांना मोठ्या प्रमाणात घरघर लागू लागली आहे.

डिजेने तरुणाईला भुरळ घातल्याने पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी एक लग्नसराई म्हटली की पाच दिवस वाद्यपथकाची सततची धावपळ सुरू असायची. सुपारी कार्यक्रमापासून वधू–वरांना गावदेवतेचे दर्शन घडवण्यापर्यंत. त्या बदल्यात दोन वेळच्या जेवणासह पाच ते आठ हजार रुपये मानधन, शिवाय ओवाळणी वेगळी.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, धार्मिक कार्यक्रमात तर संबळ पथकं अपरिहार्यच होती. एका पथकात पाच जण दोन संबळ वादक, दोन सनई वाजवणारे आणि एक सूर सेट करणारा. गावागावांत आनंदोत्सवाचे हृदय ठरायचे हे वाद्य.

परंतु गेल्या दहा–बारा वर्षांत डिजेच्या प्रचंड प्रसारामुळे ही कला अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता वर्षभरात एक–दोन लग्न किंवा धार्मिक कार्यांसाठी चौकशी येते तेवढीच. जेवढं काम त्या दिवशी मिळतं, त्यात या वाद्यांची देखभालसुद्धा भागत नाही, अशी हाळी कलाकार व्यक्त करतात.

एकेकाळी ग्रामीण भागात शंभरहून अधिक कलाकार ढोल–ताशा, झांज, संबळ, बॅंजो वाजवत होते. मात्र काळाच्या ओघात लोकांच्या पसंतीतून ही वाद्ये बाद झाली आणि नवीन पिढी देखील या कलाकडे वळली नाही. महागाईच्या झळा आणि मानधनाची घटती रक्कम यामुळे बाहेरील पथकं बोलावणं तर दूरच, स्थानिक पथकांनाही योग्य मोबदला मिळत नाही.

कधी महिनाभर आधी इसार देवून पथकं निश्चित होत असत. आता गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठीसुद्धा वादकांना काम मिळत नाही. अनेकांनी वाद्ये आठवण म्हणून ठेवली आहेत, पण पुन्हा वाजवण्याची संधी मिळत नाही.

नव्या युगातील डिजे, लाइट–साऊंड आणि आधुनिक बीट्सनी तरुणांना जिंकून घेतले, पण या प्रगतीची किंमत मात्र पिढ्यानपिढ्यांच्या कलावंतांनी चुकवली आहे. आधुनिक साहित्य विकत घेण्याची ऐपत नाही, म्हणत काही जण जुन्या वाद्यांवरच दिवस काढत आहेत. किरकोळ कार्यक्रम असला तर एखादा वादक एकटाच बोलावला जातो. पूर्वीच्या पथकाच्या उलट.

या पार्श्वभूमीवर अनुभवी ताशेवादक राजेश यादव यांचा आवाज वेदना मांडतो: “दहा वर्षांपूर्वी आम्हाला गावात बोलावलं की आमचा सत्कार, आदरातिथ्य होत असे. दोन दिवस आम्ही तिथे असायचो. मन प्रसन्न व्हायचं. आता डिजे आला आणि सगळंच बदलल, तो काळ संपून गेला.”

पारंपारिक वाद्यांची परंपरा, गावागावांतली नादमयी संस्कृती आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हे तिन्ही संकटात आले आहेत. डिजेच्या धडाक्यात पारंपारिक ध्वनी हरवत चालला आहे आणि त्यासोबत अनेक कलाकारांचे भविष्यही.

Total Visitor Counter

3072969
Share This Article