चिपळूण: चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने-गोपाळवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी गेला असता, गुरे राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाड काठीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विनायक तावडे (वय ३०, रा. मार्गताम्हाने-गोपाळवाडी) या जखमी तरुणाने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रकाश भिवा जाधव (वय ४५), मोहन भिवा जाधव (वय ५५) आणि प्रतीक प्रकाश जाधव (वय २५, सर्व रा. मार्गताम्हाने) या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गणेशचे वडील त्यांच्या घरी जात असताना सिद्धेश तावडे यांच्या म्हशीच्या वाड्यासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर आले. त्याच वेळी प्रकाश जाधव, मोहन जाधव आणि प्रतीक जाधव हे तिघे तिथे आले. त्यापैकी प्रकाश जाधव याने वडिलांना ‘तुम्ही असेच व्यवहार करता का?’ असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यांना मारहाण केली.
वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून गणेश तावडे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, आरोपी अधिकच आक्रमक झाले. प्रतीक जाधव याने गुरे राखण्यासाठी वापरली जाणारी लाकडी काठी गणेशच्या डोक्यात घातली, तर मोहन जाधव यानेही त्याला मारहाण केली. या काठीच्या मारामुळे गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याच दरम्यान, गणेशचा भाऊ विवेक तावडे कामावरून त्याच ठिकाणी आला असता, प्रतीकने त्यालाही शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर गणेश तावडे याने चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकाश जाधव, मोहन जाधव आणि प्रतीक जाधव या तिघांविरुद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.