GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीला केबीबीएफची परिषद व्हावी – उदय सामंत

रत्नागिरी: कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्होलंट फाउंडेशनने (केबीबीएफ) यापुढील परिषद मराठी उद्योजकांचे आयडॉल लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीदिनी म्हणजे २० जून रोजी मराठी उद्योजकता दिनी आयोजित करावी, अशी सूचना राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

शनिवारी दि. २१ जून रोजी सायंकाळी टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये आयोजित केबीबीएफच्या ग्लोबल मीटला भेट दिल्यानंतर मंत्री श्री. सामंत बोलत होते. ग्लोबल मीटमध्ये आलेल्या उद्योजकांनी दावोस येथेही सामंजस्य करार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्लोबल मीटचा उद्देश साध्य होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर केबीबीएफचे ग्लोबलचे अध्यक्ष प्रदीप जोशी व केबीबीएफचे संस्थापक, पितांबरी उद्योग समूहाचे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई उपस्थित होते. या दोघांनीही डॉ. सामंत यांचा यथोचित सत्कार केला.

श्री. सामंत पुढे म्हणाले की, ग्लोबल मीटचा कार्यक्रम दरवर्षी २० तारखेला करावा. कारण २० जून १८५९ हा लक्ष्मणराव किर्लोस्करांचा जन्मदिवस आहे. त्याअनुषंगाने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत २० जून हा दिवस मराठी उद्योजकता दिवस म्हणून जाहीर केला आहे. आपल्याशी किर्लोस्करांचे नाते हे अतिशय जवळचे आहे. पहिला लोखंडी नांगर किर्लोस्करांनी निर्माण केला. ते मराठी उद्योजकांचे आयडॉल आहेत. आपल्याला लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर ऐवजी लकाकी म्हणा असे ते नेहमी म्हणत. उद्योजकतेत उंची गाठली, तरी पाय जमिनीवर असावेत, हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांच्याकडून नम्रता हा गुण सर्वांनी घ्यावा. त्यांनी स्वतःचा विमानतळ तयार केला. मराठी उद्योजकांना परदेशांत चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यावेळी परदेशी उद्योजक भारतात चार्टर्ड विमानाने यायचे. त्यावेळी ते उद्योजक किर्लोस्करांच्या विमानतळावर उतरतात, असे चित्र निर्माण व्हायला हवे, यातून उद्योजकता वाढेल, याकरिता विमानतळ त्यांनी उभारला व मग विमान घेतले.

ज्यांनी केबीबीएफ ही संस्था स्थापन केली, ते उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई हे समाजाच्या घराघरांत पोहोचले आहेत. त्यामुळे ते आता राजकारणातही येऊ शकतात. ते पक्षही स्थापन करू शकतात. पितांबरी सेना, संघ नावाने करू शकतात. त्यांच्यासारखी दिग्गज व्यक्ती आपल्यात आहे, हे आपले सर्वांचे भाग्य आहे. ते आज येथे असले तरी त्यांचे लक्ष तळवडे गावाकडे आहे. त्यांच्या या स्वभावामुळे ते राजकारणात सूट होतील. पण मी विनंती करतो की रत्नागिरी, राजापूर सोडून कुठेही उभे राहा, असे सांगत मंत्री सामंत यांनी मिश्किल टिप्पणी केली. संस्थापक म्हणून ते उपस्थित राहतात. तुमच्यासारख्या उद्योजकांमुळे आमचीही उमेद वाढते.

अध्यक्ष प्रदीप जोशी यांना मी लहानपणापासून पाहत आहे. आमच्या व्यवसायासाठी त्यांचे सहकार्य आहे. त्यांनी कधीही मेजरमेंट बुक बघून खात्री करूनच सही केली. कारण ते बुक बघितल्यानंतरच बिल मिळते. बिल देताना त्यांनी कधीही पैसे मागितले नाहीत. त्यांच्यासारखे प्रामाणिक लोक केबीबीएफ ग्लोबलचे अध्यक्ष असल्याने उद्योजकांना फायदेशीर आहे, असे सांगत मंत्रीमहोदयांनी त्यांचे कौतुक केले.

मंत्री म्हणाले की, स्वप्न मोठी बघा. मी २८ व्या वर्षी आमदार झालो. अनंत अडचणी होत्या, पण त्यावर मात करून यश मिळवले. हे सर्व रत्नागिरीकरांच्या कृपेमुळेच शक्य झाले. परवाचीच्या निवडणुकीत काहींनी स्वप्ने बघितली की मी घरी गेलो. पण रत्नागिरीकरांचे कायमस्वरूपी आशीर्वाद राहिले आहेत. म्हणूनच उद्योगमंत्री झालो.

मंत्री पुढे म्हणाले की, आम्ही दावोसला जातो, तेथे मोठ्या कंपन्यांचे संचालक, सीईओ, पंतप्रधान यांच्याशीसुद्धा बोलतो. तिथे १५ हजार कोटींचे करार झाले. पण २ वर्षांपूर्वी आम्ही निर्णय घेतला की, जिल्हा स्तरावर उद्योजकांना रेड कार्पेट दिले पाहिजे. त्यामुळेच स्थानिक उद्योजकांनी ९६ हजार कोटींचा उद्योग वाढवला. या वर्षी सव्वा लाख कोटींची वाढ केली आहे.

उद्योग व्यवसायाच्या विविध अडचणींवरील निवेदनांची उत्तरे लेखी पोहोचतील आणि पुन्हा संवादाची संधी मिळाली, तर त्या सर्व अडचणी नक्कीच सोडवलेल्या असतील, अशी ग्वाही याप्रसंगी मंत्री सामंत यांनी केबीबीएफ रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सुहास ठाकुरदेसाई यांना दिली.

सौ. सई ठाकुरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला राज्यभरातून केबीबीएफचे १०० उद्योजक सदस्य उपस्थित आहेत. परिषदेचा आज समारोप होणार आहे.

Total Visitor

0217482
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *