रत्नागिरी : शहरालगतच्या भाट्ये खाडीमुखात गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला गाळ हा आता केवळ पर्यावरणाचा नव्हे तर मच्छीमारांच्या दैनंदिन संघर्षाचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा जीवघेणा प्रश्न बनला आहे. प्रत्येक वर्षी नव्या आश्वासनांनी गाळ उपशाचा प्रश्न चर्चेत येतो, पण प्रत्यक्षात काम काहीच होत नसल्याने मच्छीमारांचा संयम सुटू लागला आहे. येत्या मच्छीमारी हंगामापूर्वी ही समस्या सुटणे अशक्य वाटत असून, मत्स्य व्यवसाय विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.
काजळी नदीच्या खाडीमुखातून राजीवडा, कर्ला, भाट्ये, फणसोप, नवा फणसोप या भागांतील शेकडो मच्छीमारी नौका दररोज समुद्रात ये-जा करतात. मात्र खाडीमुखात साचलेल्या वाळू आणि गाळामुळे ही वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. भरतीच्या वेळीच नौका खाडीत घालण्याची वेळ येते आणि त्यामुळे काही वेळा नौका उलटण्याच्या, बुडण्याच्या घटना घडल्या असून काही मच्छीमारांचा जीव गेला आहे. ओहोटीच्या वेळी भाट्ये ते मांडवी दरम्यान वाळूचा लांब पट्टा पाण्याबाहेर पडतो आणि वाहतुकीसाठी फक्त अरुंद मार्गिका शिल्लक राहते.
मच्छीमारांनी गेल्या तीन-चार वर्षांत शासन, पालकमंत्री, आमदार, खासदार, व संबंधित विभागांना वारंवार निवेदने दिली आहेत. अनेकदा गाळ काढण्याच्या आश्वासनांसह प्रस्ताव पाठवले गेले, मात्र आजतागायत कोणतीही ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता आहे. या खाडीमुखात तयार झालेला सँडबार म्हणजेच वालुकास्तर आता अत्यंत धोकादायक बनला आहे. राजीवडा-भाट्ये पुलापासूनच हे सँडबार सुरू होते आणि ते नौकांना अडथळा ठरतात.
सध्या उपलब्ध असलेली मार्गिका इतकी अरुंद झाली आहे की कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या गाळ उपशावर भर न देता, लाखो क्यूबिक मीटर गाळ उपसून तो पुन्हा साचणार नाही, यासाठी दीर्घकालीन आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी हा प्रश्न गंभीर होत असून, मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या हंगामापूर्वी तरी ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
भाट्ये खाडीमुखातील गाळामुळे मच्छीमारांचा जीवघेणा संघर्ष सुरूच
