GRAMIN SEARCH BANNER

कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत- भरत गोगावले

Gramin Search
10 Views

मुंबई: कोकण विभागात भरती-ओहोटी व चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, विविध योजनांच्या लाभक्षेत्रातील पिकाखालील क्षेत्र नापिक होणे, गोड्या पाण्याचे स्त्रोत भरतीच्या पाण्यामुळे क्षारयुक्त होणे, तसेच लाभक्षेत्रातील गावांना भरती व पुराचा धोका निर्माण होणे आदी समस्या उद्भवत आहेत.

त्यामुळे बृहत आराखड्यातील नवीन योजनांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

रोजगार हमी योजनेसंदर्भात मंत्री श्री. गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार किरण सामंत शेखर निकम, वित्त विभागाचे सहसचिव विजय शिंदे, कोकण विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, जलसंपदा विभागाचे उपसचिव रोशन हटवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. गोगावले म्हणाले, सद्यःस्थितीत राज्य निधी अंतर्गत उपलब्ध निधीतून खारभूमी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. तथापि, नुकसानीस तोंड देणाऱ्या आणि भविष्यकालीन धोके लक्षात घेता नव्या खारभूमी योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून साहाय्य मिळणे गरजेचे आहे.

या निधीतून कोकण विभागातील ६६ खारभूमी योजनांची कामे हाती घेता येतील. यासाठी सुमारे ४४२.७९ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, या योजनांमुळे अंदाजे ६,९२० हेक्टर क्षेत्र पुनःप्राप्त होणार आहे. या कामांना अधिक गती देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Total Visitor Counter

2648056
Share This Article