ऍड. संकेत साळवी यांचा पुन्हा एकदा प्रभावी युक्तिवाद
गुहागर : तालुक्यातील खाडी पट्ट्यात वसलेल्या भातगाव येथे शिमगोत्सवानिमित्त दरवर्षी नमन व वग नाट्य सादर करण्याची जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. लोककलेच्या या माध्यमातून समाजप्रबोधन व मनोरंजन केले जाते. मात्र सन २०१८ मध्ये शिमगोत्सवात सादर करण्यात आलेल्या एका नमनातील काही संवादांवर आक्षेप घेत एका कुटुंबाने लोक कलाकारांविरोधात बदनामी झाल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी २० हौशी कलाकारांविरोधात फौजदारी खटला दाखल होऊन तो गुहागर न्यायालयात सुरू होता.
या खटल्यातील सर्व आरोपी हे भातगावचे ग्रामस्थ असून रोजीरोटीसाठी मुंबई व पुणे येथे वास्तव्यास होते. केवळ सणासुदीच्या काळात गावी येणाऱ्या या ग्रामस्थांना सात वर्षे चाललेल्या खटल्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्या नोकरी-व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी बचाव पक्षाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.
या केसच्या अंतिम युक्तिवादाच्या दिवशी सुद्धा बऱ्याच लोकाना कोर्टात उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते. अंतिम युक्तिवाद करताना प्रामुख्याने कोकणातील लोकपरंपरा न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कलाकारांना असलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण मंडळी तळमळीने काम करत असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात यश आलं. तसेच कायदेशीर मुद्द्यांचा आणि तरतुदींचा ऊहापोह करताना बदनामीच्या घटनांमध्ये पोलिसांना तपास करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत आणि अन्य घटनांचा संदर्भ घेवून पोलिसांनी दाखल केलेले अदखलपात्र गुन्ह्याचे दोषारोप पत्र हेच मुळात बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. ऍड. साळवी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून या प्रकरणाचा अंतिम निकाल सोमवार 22 डिसेंबर रोजी जाहीर करताना मा. न्यायाधीशांनी सादर पुराव्यांच्या आधारे लोक कलाकारांविरोधातील आरोप सिद्ध न झाल्याचे नमूद करत सर्व २० आरोपींची निर्दोष मुक्तता जाहीर केली. निकाल जाहीर होताच दीर्घ काळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
निर्दोष मुक्ततेनंतर ग्रामस्थांनी आपले वकील व त्यांच्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुहागर न्यायालयाच्या आवारात छायाचित्र काढले. या खटल्याच्या कामकाजात ऍड. संकेत साळवी यांच्यासह अॅड. मानसी सोमण, अॅड. रोशनी पवार, अॅड. अलंकार विखारे व अॅड. सुप्रिया वाघधरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
गुहागर : नमनातील संवादांवर आक्षेप, सात वर्षांच्या खटल्याअंती भातगावातील २० हौशी कलाकारांची निर्दोष मुक्तता







