रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. याच महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील साखरप्यानजीक दख्खन गावातील दुरवस्थेमुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दख्खन गावची भौगोलिक स्थिती पाहता डोंगरावर पश्चिमेकडे गाव वस्ती आहे. भातशेती व पशुपालन महामार्गाच्या पलीकडे म्हणजे पूर्वेकडे आहे. स्मशानभूमी व बाजारपेठेत जाण्यासाठी याच महामार्गावरून सतत गाड्यांच्या रहदारीमुळे प्राण्यांना व माणसांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती बांधल्यामुळे जुन्या पायवाटा बंद झाल्या आहेत. महामार्गालगत असणारी पाण्याची सार्वजनिक विहीर बुजवून टाकण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता कोणीच नीट उत्तरे देत नाहीत.
या महामार्गावर एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी मुर्शी गावापासून ते थेट आंबा घाट संपेपर्यंत कोठेही रस्ता ओलांडण्याची सोय किंवा भुयारी मार्ग नसल्याने पाळीव प्राण्यांचेही हाल होत आहेत. त्यामुळे महामार्ग ओलांडताना जनावरे व ग्रामस्थ यांचा अपघात होऊन जीवितहानीची शक्यता आहे.
सतत सुरुंग लावल्यामुळे डोंगर खिळखिळे होऊन दरड कोसळल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दबते, फुटते. त्यामुळे पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. भुयारी मार्गासाठी अनेक वेळा निवेदन देऊनही त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. अनेक जीवघेण्या समस्या निर्माण झाल्यामुळे दख्खन गावातील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी : मिऱ्या नागपूर महामार्गाच्या दुरवस्थेमुळे दख्खनचे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
