पाली : मुंबई-गोवा महामार्गालगतच्या पाली बाजारपेठेतील मराठवाडी भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून सुमारे ₹4,88,075 किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली आहे. या दिवसा-दिवसाच्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रमेश मधुकर सावंत हे रिक्षा व्यवसाय करतात. 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.35 ते 7.15 वाजण्याच्या दरम्यान ते, त्यांची पत्नी व मुलगा घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट उचकटून चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
मुद्देमालाची यादी
मंगळसूत्र (२९ ग्रॅम), बांगड्या (४० ग्रॅम), चेन (८.५ ग्रॅम), डूल (१.७ ग्रॅम), हार (१० ग्रॅम), कानवेल (१ ग्रॅम), सोन्याचे टॉप (४ ग्रॅम), चेन (२ ग्रॅम) आणि रोख ₹३,५०० – असा एकूण सुमारे १० तोळे सोन्याचा व रोख रकमेचा मुद्देमाल लंपास झाला.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक पुरावे गोळा केले.
रमेश सावंत यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे करीत आहेत. नागरी वस्तीत दिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे पाली विभागात खळबळ उडाली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी : पालीत दिवसा घरफोडी; दहा तोळे सोने, साडेचार लाखांचा ऐवज लंपास
