मुंबई: गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे क्षण घडले असून, ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. बुधवारी सकाळी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी येऊन गणेशाचे दर्शन घेतले.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वैयक्तिकरित्या फोन करून गणेशोत्सवासाठी आमंत्रित केले होते आणि उद्धव यांनी ते स्वीकारत शिवतीर्थवर दाखल होत प्रथमच या निवासस्थानी प्रवेश केला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
याआधी २७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे अनेक वर्षांनी ‘मातोश्री’वर पोहोचले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेला संवाद आणि मनोमिलन हळूहळू दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन महिन्यांत ही तिसरी वेळ आहे की दोन्ही बंधू समोरासमोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘हिंदी सक्ती’ विरोधात वरळी येथे झालेल्या सभेत दोघे एकत्र दिसले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी “हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है” असे वक्तव्य करत भविष्यातील संभाव्य राजकीय युतीची चाहूल दिली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका समीप असताना ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे विशेष महत्त्वाचे ठरत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येऊन बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक लढवली असली तरी त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. भाजप समर्थित पॅनेलने विजय मिळवल्यानंतर या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली आजची भेट पुन्हा एकदा या युतीच्या शक्यता बळकट करत आहे.
राज ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी दादरमधील ‘कृष्णकुंज’ सोडून नव्या ‘शिवतीर्थ’मध्ये वास्तव्य केले. हे निवासस्थान त्यांच्या कलासक्त दृष्टिकोनातून सजवलेले असून अनेक नेतेमंडळी तिथे भेट देऊन गेले आहेत. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील मतभेदांमुळे उद्धव ठाकरे कधीही शिवतीर्थवर गेले नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची आजची भेट ऐतिहासिक ठरली आहे. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे हे दुपारी राज ठाकरे यांच्या घरी जेवणासही बसणार असून, त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील नाते अधिक दृढ होण्याची चिन्हे आहेत.
अनेक वर्षांच्या राजकीय मतभेदानंतर गणेशोत्सवाने ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र आणले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये एकत्रितपणे लढण्याची शक्यता अधिक दृढ होत असल्याचे आजच्या भेटीतून स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह राज ठाकरेंच्या घरी दर्शनाला
