चिपळूण: शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय ओवेस जुलफीकार मुल्ला या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 10 वाजता उघडकीस आली. या तरुणाचे वडील चिपळूणमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबतची माहिती डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला (53, एकता अपार्टमेंट) यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवेसने घरातील शौचालयाच्या खिडकीला असलेल्या लोखंडी ग्रीलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी ओवेस शौचालयातून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी अखेर शौचालयाचा दरवाजा तोडला. त्यानंतर ही आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील डॉक्टर आहेत. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करत आहेत.