GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी येथे दुचाकी अपघातात तरुण जखमी

Gramin Varta
188 Views

रत्नागिरी : बांधखिंड परिसरात दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात शुभम नाचणकर (रा. आंबे शेत) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

माहितीनुसार, शुभम नाचणकर हा आपल्या दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना बांधखिंड येथील शिवसृष्टी गृहनिर्माण संस्थेसमोर अचानक एक कुत्रा रस्त्यावर धावून आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा तोल गेल्याने शुभम रस्त्यावर पडला. या अपघातात त्याला विविध ठिकाणी दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील व केतन साळवी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, बांधखिंड परिसरात गेल्या महिनाभरात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गणपतीपुळे मार्गावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून विशेषतः सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. मात्र, या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बांधखिंड परिसर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करून वेग नियंत्रक रंबलर (स्पीड ब्रेकर) बसवण्याची मागणी केली होती. मात्र, सहा महिने उलटूनही याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3199520
Share This Article