रत्नागिरी : जयगड ते हातखंबा हा रस्ता सध्या विकासाचा नव्हे, तर मृत्यूचा मार्ग ठरत असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. जेएसडब्ल्यूसह बंदरांशी संबंधित ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांत निरपराध नागरिकांचे प्राण जात आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी, निवेदने आणि आंदोलने करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आता वेगळ्याच पद्धतीने आपला रोष व्यक्त केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी शनिवारी जयगड–हातखंबा मार्गावरून धावणाऱ्या डंपर चालकांचे गुलाबपुष्प देऊन ‘स्वागत’ केले. मात्र या स्वागतामागे उपरोध होता. “अजून बळी घेण्यासाठी शुभेच्छा” असा टोला लगावत त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर आणि बेफिकीर वाहतुकीवर तीव्र शब्दांत प्रहार केला. शांततेतून केलेले हे आंदोलन प्रशासनाच्या संवेदनशून्यतेवर आरसा धरून जाणारे ठरले.
या मार्गावर मागील काही महिन्यांत अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. २००५ पासून जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्टच्या माध्यमातून मालवाहतूक सुरू झाली. सुरुवातीला मर्यादित वाहतुकीमुळे फारसा त्रास जाणवला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत वाहतुकीत प्रचंड वाढ झाली, तरी रस्त्याची रुंदी, मजबुती आणि सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था आणि डंपर चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे दर महिन्याला किमान एक तरी नागरिक या रस्त्यावर जीव गमावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या मार्गालगत शाळा, महाविद्यालये आणि वस्ती असल्याने विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे अनेकदा वाहतूक ठप्प होते, अपघात घडतात आणि भीतीचे वातावरण पसरते. तरीही आरटीओ, पोलीस व संबंधित प्रशासन यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था’तर्फे प्रशासन, आरटीओ आणि पोलिसांना प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली.
उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आजही जयगड मार्गावर ओव्हरलोड डंपर वाहतूक बिनदिक्कत सुरू असल्याचे प्रथमेश गावणकर यांनी सांगितले. वाहतुकीला विरोध नाही, पण अरुंद रस्ता, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात न घेता सुरू असलेली बेफिकीरी असह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“अपघात झाल्यानंतरच प्रशासन आणि पोलीस धावत येणार असतील, तर अशा व्यवस्थेची जबाबदारी कोणाची?” असा सवाल उपस्थित करत गावणकर यांनी संताप व्यक्त केला. भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांना संबंधित प्रशासनच जबाबदार असेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. शांत, उपरोधिक पण तीव्र आशयाच्या या आंदोलनामुळे तरी प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.







