देवरुख: शिक्षण आणि सैनिकी शिस्त यांचा आदर्श संगम घडवत, येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका सौ. सानिका समीर भालेकर-भुवड यांनी भारतीय सैन्याच्या नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) चे सुमारे तीन महिन्यांचे अत्यंत खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ‘लेफ्टनंट’ हे मानाचे पद प्राप्त केले आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून गाव विकास समितीच्या महिला आघाडी कडून सानिका भालेकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
प्राध्यापिका सानिका भालेकर-भुवड या गेली सुमारे २७ ते २८ वर्षे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा अध्यापनाचा विषय अर्थशास्त्र असून, त्या सध्या पीएच.डी. चे संशोधनही करत आहेत. या शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच, गेली आठ ते नऊ वर्षे त्या महाविद्यालयाचे एनसीसी युनिट अतिशय यशस्वीरित्या सांभाळत आहेत. स्वतः ‘लेफ्टनंट’ पदापर्यंत मजल मारून त्यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. सैनिकी प्रशिक्षणात असलेली शारीरिक आणि मानसिक आव्हाने त्यांनी समर्थपणे पेलली आणि अत्यंत कमी वेळेत हे पद प्राप्त केले.
त्यांच्या या असाधारण यशाबद्दल गाव विकास समितीच्या महिला आघाडीच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या गौरव सोहळ्याला गाव विकास समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. दिक्षा खंडागळे, महिला संघटना उपाध्यक्षा व देवरुख शहर अध्यक्षा सौ.अनघा कांगणे, सदस्या अनवी घुग आणि गाव विकास समितीचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष व निवळी गावचे सरपंच दैवत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक आणि सैनिकी अशा दोन्ही आघाड्यांवर मिळवलेल्या या दुहेरी यशामुळे प्राध्यापिका भालेकर-भुवड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेला ‘लेफ्टनंट’चा बहुमान; सौ. सानिका भालेकर-भुवड यांचे गाव विकास समिती कडून अभिनंदन
