गणपतीच्या पार्श्वभूमीवर थांबा दिल्याने चाकरमानी सुखावले
राजापूर : कोकणातील चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय! मुंबई-कोकण-दक्षिण भारत जोडणारी नेत्रावती एक्स्प्रेस आता थेट राजापूर रोड स्थानकावर थांबणार आहे. या थांब्यामुळे मुंबईतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना तसेच कोकणातून केरळ, गोवा किंवा इतर राज्यांत जाणाऱ्यांना प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर हा निर्णय झाल्याने प्रवासी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. राजापुरात नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी राजापूरचे सुपुत्र ऍड स्वप्नील इनामदार यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेउन त्यांच्या मागणी प्रमाणे रेल्वे मंत्रालयाने राजापूर येथे नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा देण्याचे आज जाहीर केले आहे. त्यामुळे राजापुरातील चाकरमान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने नेत्रावती एक्स्प्रेसला (16345/16346) राजापूर रोड स्थानकावर प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. श्री गणेशाच्या आगमना आधीच सदर गाडीचा फायदा हा राजापूर वासियांना होणार असल्यामुळे मुंबई हून येणाऱ्या चाकरमान्यांची खूप मोठी सोय होणार असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण आहे.
राजापूरला नेत्रावती गाडीला थांबा मिळावा यासाठी शेहनवाज ठाकूर, राजापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. सुलतान ठाकूर, समाज सेवक श्री अमृत तांबडे, श्री अभय मळेकर, श्री अनिल ठाकूर देसाई, श्री श्रीकांत ताम्हणकर, राजापूर व्यापारी संघांचे अध्यक्ष श्री. संदीप मालपेकर यांसारख्या प्रतिष्ठित मंडळींनी देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा हा ऍडव्होकेट इनामदार यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत यांच्याकडे केला होता. उशीरा का होईना, पण सरकारने राजापूरकर वासियांची मागणी मान्य केली याचा आनंद या सर्वांनी व्यक्त केला आहे.
*गाडीचे वेळापत्रक*
गाडी क्रमांक 16345 (लोहमार्ग टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेस) : राजापूर रोड आगमन १९:४०, प्रस्थान १९:४२
गाडी क्रमांक 16346 (तिरुअनंतपुरम सेंट्रल – लोहमार्ग टर्मिनस “नेत्रावती” एक्स्प्रेस) : राजापूर रोड आगमन व प्रस्थान ०७:३८ / ०७:४०
या प्रायोगिक थांब्यामुळे मुंबईतून थेट राजापूरपर्यंत प्रवास करणाऱ्यांना वेळ आणि श्रम वाचणार आहेत. तसेच राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवासाची उपलब्धता वाढल्याने रोजगार, शिक्षण, पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
ब्रेकिंग : राजापुरात नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा, नागरिकांत जल्लोष
