चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील शहानुरबाबा दर्गा परिसरातील भोपाळ कॉलनीजवळ गुरुवारी (३१ जुलै) सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सकाळी ९:५० च्या सुमारास घडली. पोफळीहून चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बस ( एमएच २०-बीए ३९४५) चे चालक रतन संभाजी दहीफळे (वय ३६) हे बस घेऊन जात होते. त्याचवेळी, समोरून चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दापोली-पंढरपूर एसटी बस ( एमएच १४-बीटी ४६१५) च्या चालकाने समोरून जोरात धडक दिली.
या अपघातात दोन्ही बसच्या दर्शनी काचा, साइड मिरर, शो आणि बंपर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर दहीफळे यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दापोली-पंढरपूर बसचा चालक त्रंबक गोविंद नागने (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक प्रकरणी एकावर गुन्हा
