लांजा (प्रतिनिधी): लांजा शहरातील राजदीप मोबाईल शॉपीतून एका अज्ञात व्यक्तीने बनावट ॲपचा वापर करून ३६,९९९ रुपये किमतीचा विवो व्ही ५० मोबाईल फसवणुकीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक ८ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली होती.
या प्रकरणी राजदीप मोबाईल शॉपीचे मालक, प्रकाश विद्यानंद शर्मा (वय ३५, रा. वावधनकर चाळ, वैभव वसाहत, मूळ रा. गाव मिश्रवलीया ता. मंझा जिय, गोपालग्ज) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने मोबाईल खरेदी करताना फोन पे द्वारे पैसे दिल्याचे भासवले, मात्र बनावट ॲपचा वापर करून ही फसवणूक केली.
लांजा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८ (२) नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.