मुंबई: परफॉर्मन्स मोटारसायकल निर्माता कंपनी डुकाटी मोटरसायकल भारतात आपली लोकप्रिय मॉन्स्टर मोटारसायकल नव्या अवतारात सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी १० ऑगस्ट रोजी भारतात २०२६ डुकाटी मॉन्स्टर लाँच करणार आहे.
प्रीमियम स्ट्रीट मोटारसायकल विभागात आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा लाँच कंपनीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
नवीन डुकाटी मॉन्स्टरमध्ये जुन्या मॉडेलचा आक्रमक स्ट्रीटफायटर लूक कायम ठेवण्यात आला असून, नव्या मॉडेलचे डिझाइन अधिक शार्प आणि अॅथलेटिक करण्यात आले आहे. विशेष ओव्हल एलईडी हेडलॅम्प, उठावदार मेकॅनिकल पार्ट्स आणि कॉम्पॅक्ट टेल सेक्शन यामुळे मोटारसायकलला आकर्षक आणि मस्क्युलर लूक मिळतो. मॉन्स्टर मालिकेची ओळख असलेली दमदार बॉडी रचना नव्या मॉडेलमध्येही कायम ठेवण्यात आली आहे.
नवीन डुकाटी मॉन्स्टरमधील सर्वात मोठा बदल इंजिनमध्ये करण्यात आला आहे. जुन्या ९३७ सीसी एल-ट्विन इंजिनच्या जागी आता नवीन ८९० सीसी व्ही-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ९,००० आरपीएमवर १०९.४ बीएचपीची कमाल पॉवर आणि ७,२५० आरपीएमवर ९१ एनएमचा कमाल टॉर्क निर्माण करते. जुन्या इंजिनच्या ११० बीएचपी पॉवर आणि ९३.५ एनएम टॉर्कच्या तुलनेत हे आकडे काहीसे कमी आहेत. मात्र, नवीन पॉवरट्रेनमुळे रायडिंगचा अनुभव अधिक चांगला मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
बाइकमध्ये एल्युमिनियम मोनोकोक फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. सस्पेन्शनसाठी पुढील बाजूस ४३ मिमी शोवा यूएसडी फोर्क, तर मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टमेंटसह शोवा मोनोशॉक देण्यात आला आहे. ब्रेकिंगसाठी ब्रेम्बो ब्रेकिंग सिस्टिम असून, पुढे ३२० मिमीचे ट्विन डिस्क आणि मागे २४५ मिमीचा सिंगल डिस्क ब्रेक मिळतो. हलक्या अलॉय व्हील्ससह पिरेली डियाब्लो रोसो फोर टायर्स देण्यात आले आहेत.
फीचर्सच्या बाबतीतही नवीन मॉन्स्टरमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स पॅकेज मिळणार आहे. यामध्ये रायडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, क्विकशिफ्टर आणि रायडरला मदत करणाऱ्या विविध इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्सचा समावेश आहे. भारतामध्ये २०२६ डुकाटी मॉन्स्टरची एक्स-शोरूम किंमत अंदाजे १४ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. तर अधिक प्रीमियम मॉन्स्टर प्लस व्हेरिएंटची किंमत स्टँडर्ड मॉडेलपेक्षा सुमारे २० ते ३० हजार रुपयांनी अधिक असू शकते. लाँचनंतर या मोटारसायकलची थेट स्पर्धा ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आणि कावासाकी झेड९०० यांसारख्या प्रीमियम नेकेड मोटारसायकलींशी होणार आहे.






