राजापूर – तालुक्यातील जानशी पारवाडी येथे शुक्रवारी सकाळी एका आंब्याच्या झाडाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह जानशी गावातील ३३ वर्षीय शैलेश वामन धुरी यांचा असून, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दुर्दैवाने त्याचा हा मृतदेह आईनेच पाहिला आणि तिची बोबडीच वळली. तिने हंबरडा फोडला. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. अखेर तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शैलेश धुरी यांची आई नारळ शोधण्यासाठी नारळाच्या झाडाजवळ गेल्या असता, त्यांना जवळच्याच एका आंब्याच्या झाडाखाली काहीतरी पडलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले असता, त्यांना चौकट्यांच्या शर्टमधील एका व्यक्तीचा फुगलेला आणि पालथा मृतदेह दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हा मृतदेह आपला मुलगा शैलेश याचा असल्याची खात्री पटल्यावर त्या हादरून गेल्या. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ आईवर आली. तिने तातडीने पोलिसांना माहिती दिली. राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, आंब्याच्या झाडाच्या फांदीला तुटलेली नायलॉनची दोरी लटकलेली दिसली. यावरून शैलेश धुरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृतदेह फुगलेला असल्याने ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत असून, या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजापूरात 33 वर्षीय तरुणाची गळफासाने आत्महत्या, मृतदेह आईलाच दिसला आणि हंबरडा फोडला
