खेड: तालुक्यातील संगलट येथे असलेल्या बीएसएनएल टॉवरमधून सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २९ जुलै ते ३० जुलै २०२५ या कालावधीत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप नारायण देसाई (वय ३०) हे बीएसएनएलमध्ये नोकरीला आहेत. ३० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांना बीएसएनएल कार्यालयातील टेक्निशियन महेंद्र शिर्के यांचा फोन आला. शिर्के यांनी देसाई यांना सांगितले की, ते वेदांत कंपनीच्या गोवा येथील कर्मचाऱ्यांसोबत संगलट येथील बीएसएनएल टॉवरवर साहित्य बसवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना टॉवरच्या बंद खोलीचे कुलूप तोडलेले दिसले. १५ जुलै रोजी ठेवलेले काही साहित्य खोलीतून गायब झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.
या माहितीनंतर देसाई यांनी १९ ऑगस्ट रोजी स्वतः संगलट येथील टॉवरला भेट दिली. पाहणी केली असता, अज्ञात आरोपीने हत्याराने खोलीची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि दोन रिमोट रेडिओ हेड (आर.आर.एच) बीए, बी २८ आणि बी २८ हे साहित्य चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या साहित्याची एकूण किंमत २ लाख २० हजार रुपये आहे.
या घटनेनंतर देसाई यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात ल गुन्हा दाखल केला आहे.
खेडमध्ये बीएसएनएल टॉवरमधून २.२० लाखांचे साहित्य चोरीला
