नेवासा येथून नाणिजला मामाकडे आला होता राहायला
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला हादरविणारी घटना समोर आली आहे. नेवासा येथून नाणिज येथे मामाकडे आलेल्या 17 वर्षीय तरुणाने मोबाईल गेमच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोबाईल गेमच्या अतिव्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी घडली. रवींद्र राजेंद्र बेंद्रे (वय १७, रा. नेवासा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहील्यानगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हा गेल्या वीस दिवसांपासून नाणीज येथे आपल्या मामाकडे, विकास पोपट म्हसे यांच्याकडे, कॉलेज शिक्षणासाठी आला होता. रवींद्रला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन होते आणि याच कारणामुळे तो अस्वस्थ होता, तसेच त्याला तीव्र नैराश्य आले होते.
२४ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रवींद्रने आपल्या राहत्या खोलीतील लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याला तात्काळ खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय, पाली येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेची खबर रवींद्रचा मामा विकास पोपट म्हसे यांनी नाणीज पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेमागचे नेमके कारण आणि इतर तपशील तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोबाईल गेमच्या व्यसनाचे गंभीर दुष्परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.
रत्नागिरी हादरली : मोबाईलवर गेम हरल्याने नाणीज येथे १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
