मुंबई: हाताने चालवणाऱ्या तीनचाकी सायकलींमुळे दिव्यांग व्यक्तींच्या शरीरस्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. याची दखल घेत राज्य सरकारने दिव्यांगांसाठी या सायकलींचे वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांतर्गत होणारे वाटप करू नये, असे निर्देश संबंधित घटकांना दिले आहेत. दरम्यान, सहजसोप्या पद्धतीने चालविता येणाऱ्या बॅटरीवरील सायकली दिव्यांगांना द्याव्यात, अशी मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.
राज्यात दिव्यांग कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, स्थानिक स्वराज संस्थांकडून दिव्यांगांसाठी करण्यात येणारे साहित्याचे वाटप आणि लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत तीनचाकी हाताने चालवणाऱ्या सायकलींचे वाटप करण्यात येते. केंद्र सरकारच्या ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत ही ‘ॲलिमको’ या प्राधिकृत संस्थेतर्फे ही विविध कार्यक्रमात या सायकलींचे वाटप केले जाते. मुळातच दिव्यांग व्यक्ती शरीराने कमकुवत असते. त्यातच अशी जड सायकल हाताळणे, त्यांच्यासाठी जिकिरीचे होत असते.
नियमित सायकल चालविताना धडदाकट माणसाला ही अक्षरश: घाम फुटतो. त्या तुलनेत कमकुवत असलेल्या दिव्यांगांच्या अंगात तितकी ताकद नसल्याने त्यांना सायकल चालविणे अडचणीचे ठरते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत तीनचाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार नुकताच शासन निर्णय झाला.
त्यात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करताना त्यांच्या आरोग्याचे हित विचारात घेऊन, दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांतर्गत तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप करण्यात येऊ नये. याची सर्व प्रशासकीय विभाग व त्याअंतर्गत येणारी सर्व क्षेत्रीय कार्यालये, अन्य शासकीय-निमशासकीय संस्था यांनी दक्षता घ्यावी व या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे म्हटले आहे. या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याबाबत शासनस्तरावरून कळविले आहे.
सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य असून, त्याचे स्वागत आहे. शरीर कमकुवत असलेल्या दिव्यांग व्यक्तीला तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीमुळे त्रास होतो. त्यामुळे विविध कार्यक्रमांत व शिबिरांत विविध शासकीय योजनांतर्गत मिळालेल्या सायकली दिव्यांग घेत नाहीत. यासाठी सरकारने ८० टक्क्यांपासून १०० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना ज्या प्रमाणे बॅटरीवरील सायकली दिल्या जातात, त्याप्रमाणे ८० टक्क्यांच्या आत दिव्यांगत्व असलेल्या सर्वच दिव्यांगांना या बॅटरीवरील सायकली द्याव्यात.
– अनिल मिरजे, अध्यक्ष, शिवसंग्राम दिव्यांग संघटना
दिव्यांगांना तीनचाकी सायकली बंद, शरीरस्वास्थ्यावर गंभीर परिणाम; सरकारचा निर्णय






