मंडणगड: धार्मिक स्थळाला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीमध्ये (मस्जिद) फोडून करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरून नेला आहे. या चोरीमुळे पिंपळोली गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळोली येथील मशिदीत बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी ते गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पिंपळोली मुस्लिम मोहल्ला येथील रहिवासी आणि गावाचे काझी असलेले हुसेन इब्राहीम पेटकर (वय ८७) यांनी या चोरीची तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात चोरट्याने मशिदीतील पाण्याच्या टाकीच्या रूमचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर रूममधील सागवानी बॉक्सला लावलेले कुलूप तोडून आतील चांदीचे मौल्यवान दागिने आणि वस्तू लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या मालात विशेषतः मशिदीवर लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. यात अंदाजे दीड किलो वजनाचा व १ लाख ५० हजार रुपये किमतीचा चांदीचा चाँद (चाँद), ४५ हजार रुपये किमतीचे अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे गोंडे, ३० हजार रुपये किमतीचे अंदाजे २०० ग्रॅम वजनाचे निशाणावर लावायचे ३ चांदीचे गोंडे आणि २२ हजार रुपये किमतीचे अंदाजे २०० ग्रॅम वजनाचे लहान आकाराचे तीन चांदीचे चांद-तारे यांचा समावेश आहे. असा एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेची तक्रार गुरुवारी, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११ वाजून २ मिनिटांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी गु.आर.नं. ५४/२०२५ नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक स्थळी झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, मंडणगड पोलीस या अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.