GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये भरधाव मोटरसायकलची रिक्षाला धडक; तीन जखमी, दुचाकीस्वारावर गुन्हा

खेड : तालुक्यातील वेरळ रोडवर शुक्रवारी (२१ जून) सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. भरधाव वेगाने, ट्रिपल सीट आणि रॉंग साईडने येणाऱ्या मोटारसायकलने एका रिक्षाला जोरदार धडक दिली, यात रिक्षाचेही नुकसान झाले. या प्रकरणी खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपत काशिराम जाधव (वय ४६, रा. कुळवंडी, जांभुळवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपली (एम.एच. ०८ एक्यु ७०८१) रिक्षा घेऊन घरी जात होते. वेरळ रोडवर समोरून (एम.एच. ०८ ए.यु. ८६३०) मोटारसायकल ट्रिपल सीट येत होती. ही मोटारसायकल अत्यंत भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने (रॉंग साईड) येत असल्याने, तिने गणपत जाधव यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचे नुकसान झाले, तर मोटारसायकलवरील तिघे जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यांची नावे आणि गावांबद्दल माहिती मिळू शकली नाही.

गणपत जाधव यांच्या तक्रारीनुसार, खेड पोलिसांनी मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2475146
Share This Article