साखरपा / सिकंदर फरास: आंबा घाटात ऊन, पाऊस आणि वाऱ्याची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या एसटी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवारा शेडची व्यवस्था करून दिल्याबद्दल एसटी कर्मचारी आणि पोलिसांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत. घाटातील संवेदनशील परिस्थितीत सतत ड्युटी बजावताना उघड्यावर राहण्याची होणारी गैरसोय या निवारा शेडमुळे दूर होणार असून, डोक्यावर छप्पर मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबा घाटातून एसटी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी कर्मचारी आणि पोलीस सातत्याने तैनात असतात. घाटातील दरडी कोसळणे, डोंगर खचणे तसेच अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता या कर्मचाऱ्यांना परिसरावर सतत नजर ठेवावी लागते. एखादी दुर्घटना घडल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रणात आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते.
मात्र, एवढी महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ उघड्यावरच ड्युटी करावी लागत होती. उन्हाळ्यात कडक उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागत होता, तर पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि वाऱ्यातही कर्तव्य बजावावे लागत होते. ड्युटीदरम्यान काही काळ थांबण्यासाठीही योग्य निवारा नसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती.
ही बाब लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी तातडीने पुढाकार घेत कर्मचाऱ्यांसाठी निवारा शेडची व्यवस्था केली. त्यामुळे आता ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून त्यांना संरक्षण मिळणार आहे. विशेषतः घाटात एखादी दुर्घटना किंवा डोंगर खचण्याची घटना घडल्यानंतर बराच वेळ घटनास्थळी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
निवारा शेडची व्यवस्था झाल्याने एसटी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कर्तव्य बजावताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी तातडीने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. प्रतिकूल हवामानात ड्युटी बजावताना आता काहीसा दिलासा मिळणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आंबा घाटातून सुरक्षित वाहतूक सुरू ठेवण्यात एसटी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी दिवसरात्र तैनात असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या सुविधेची दखल घेऊन निवारा उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांच्या कामातील अडचण काही प्रमाणात कमी झाली आहे.
आंबा घाटातील निवारा शेडने एसटी कर्मचारी पोलिस भारावले; आमदार किरण सामंतांचे मानले आभार
Leave a Comment






