मुंबई: येथील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास उच्च न्यायालयाने कायम बंदी ठेवल्यानंतर आता जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही काही जैन बांधवांनी दादर कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य टाकले होते, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी १३ ऑगस्टपासून उपोषण आणि आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले की, “जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचे काम नाही, पण धर्माच्या रक्षणासाठी गरज पडल्यास आम्ही शस्त्र हाती घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही. आम्ही भारताचे संविधान मानतो, कोर्टालाही मानतो, पण आमच्या धर्माविरोधात काही आले तर कोर्टालाही मानणार नाही.”
त्यांनी आरोप केला की, कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला असून हा आमच्या धार्मिक आस्थेवर घाला आहे. “मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये, ही आमच्या धर्माची शिकवण आहे. मग कबुतरांच्या मृत्यूची चिंता का करू नये? दारू व मांसाहारामुळे होणाऱ्या मृत्यूंचीही चर्चा व्हायला हवी,” असे ते म्हणाले.जैन समाजाने पालिकेकडे कबुतरांना खाद्य देण्यासाठी परवानगी मागितली असून, पर्युषण पर्व संपल्यानंतर पुढील तीव्र आंदोलनाची चेतावणीही दिली आहे. देशभरातील १० लाख जैन बांधव आंदोलनात सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला.
दादर कबुतरखाना बंदीवरून जैन समाज आक्रमक; १३ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा
