रत्नागिरी । रत्नागिरी शहराजवळील मजगांव येथील इब्जी कुटुंबातील डॉ. अब्दुल्ला अब्दुल मजीद इब्जी यांनी नुकतीच एम.डी. (मेडिसीन) ही उच्च वैद्यकीय पदवी प्राप्त केल्याबद्दल, मजगांव ग्रामस्थ आणि जमातुल मुस्लिमीन मजगांव यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या गावातील तरुणाने मिळवलेल्या या देदीप्यमान यशामुळे मजगांव परिसरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. अब्दुल्ला इब्जी यांनी वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेल्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात जमातुल मुस्लिमीनचे उपाध्यक्ष हाफिज अब्दुल करीम नाकाडे यांनी कुराण पठण करून केली.
यावेळी जमातीचे अध्यक्ष रियाज मुकादम यांनी डॉ. अब्दुल्ला यांचे कौतुक करताना गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, “डॉ. अब्दुल्ला यांनी एम.डी. डॉक्टर होण्याचा मान आपल्या गावाला मिळवून दिला आहे, ही मजगांवसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.” त्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. अब्दुल्ला इब्जी यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
याचबरोबर, डॉ. अब्दुल्ला यांना या यशासाठी प्रोत्साहन देणारे त्यांचे वडील अब्दुल मजीद इब्जी, त्यांचे चुलते एजाज इब्जी, तसेच उपसरपंच शरीफ इब्जी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. आपल्या मुलाचा आणि कुटुंबियांचा ग्रामस्थांनी केलेला सत्कार पाहून अब्दुल मजीद इब्जी यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
या विशेष कार्यक्रमासाठी रियाज मुकादम, अब्दुल करीम नाकाडे, शरीफ ठाकूर, मकबूल मुकादम, फिरोज मुकादम, सरपंच फैयाज मुकादम, आदिल नाकाडे, इमाद इब्जी, सुफियान मुकादम, रेहान मुकादम तसेच इम्तियाज मुकादम आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मजगांवच्या या सुपुत्राच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रात गावाचे नाव उज्वल झाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.