मुंबई: मुंबई-शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी नेस्को सेंटर येथील दसरा मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत स्फोटक आणि खळबळजनक आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह दोन दिवस तसाच ठेवून दिला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता, काढा माहिती. हे मी जबाबदारीने बोलत आहे. मी खूप मोठे विधान करत आहे याची मला जाणीव आहे, असे ते म्हणाले. रामदास कदम यांनी यावेळी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विचारण्याची मागणी केली.
रामदास कदम पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? आतमध्ये तुमचे काय चालले होते? बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याची चर्चा मातोश्रीवर होती, ते कशासाठी घेण्यात आले होते, असा सवालही त्यांनी केला. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र कधी करण्यात आले आणि त्यावर कोणाची सही होती, याबद्दलची माहिती बाहेर काढण्याची मागणी कदम यांनी केली. उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा हव्यास असल्याचा आरोप केला. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत जात शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली, असे ते म्हणाले. सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे भीकेचा लोटा घेऊन जात असल्याची टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी 30 वर्षे फक्त टक्क्यांचे राजकारण केले, असा आरोप करत, त्यांच्या काळात मुंबईचा महापौर शिवसेनेचा असूनही शिवसैनिकांना महापालिकेत जायचा अधिकार नव्हता, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला?निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, रामदास कदम यांचा गंभीर आरोप
