तुषार पाचलकर (राजापूर)
अनुस्कुरा घाटात आज सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले होते. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचले नव्हते.
प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संजय माने व पो.कॉ. सचिन बलीप यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. रस्त्यावर पडलेले दगड व माती बाजूला करून तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या तत्परतेबद्दल प्रवाशांनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
दीड तासानंतर अनुस्कुरा घाटातील वाहतूक सुरळीत, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उचलली दरड
